CM Eknath Shinde Vs Jarange Patil : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन सुरू आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य सरकारने कुणबी वगळता मराठा समाजाला सरसकट दहा टक्के आरक्षण दिले आहे. जरांगे पाटील यांनी शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
मात्र कुणबी प्रमाणपत्र धारक व्यक्तीच्या सगे सोयऱ्यांना देखील ओबीसी मधून आरक्षण मिळायला पाहिजे, यामुळे त्यांनी सगे-सोयऱ्यांबाबत सुद्धा सरकारने कायद्यात तरतूद केली पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
काल मात्र जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाने थोडीशी वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. आंदोलनादरम्यान जरांगे पाटील अचानक संतप्त झालेत. तसेच त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत.
त्यांनी मला सलाईनमधून विष दिले जात असल्याचे गंभीर आरोप यावेळी केलेत. तसेच ते आंदोलनाच्या ठिकाणावरून उठून संतापात फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झालेत. यामुळे आंदोलन स्थळी जमा झालेल्या त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली.
अनेकांनी जरांगे पाटील यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिवीगाळ करत संतापात आंदोलन स्थळावरून निघून गेलेत. यामुळे या आंदोलनाला थोडीशी वेगळी दिशा मिळाली.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र कायदा हातात घेण्याची कुणालाच मुभा नसल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना ईशारा दिला होता. सरकारने कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही असे सांगितले. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात ज्यांचा हात असेल त्यांना माफ केले जाणार नाही असा इशारा देखील यावेळी सरकारने जाहीर केला.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आज मात्र अचानक मनोज जरांगे पाटील यांनी मवाळ भूमिका घेतली आहे. ते पुन्हा आंदोलन स्थळी परतले असून त्यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा सुद्धा केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील विरुद्ध सरकार असे चित्र असतानाच सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संवाद होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये पटोले यांनी राज्याच्या राजकीय परिस्थिती विषयी काहीतरी विचारलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात हे काय चाललं आहे असे पटोले यांनी मुख्यमंत्री महोदय यांना विचारले. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत ‘जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत ठिक होते. पण लिमीटच्या बाहेर गेला की मी कार्यक्रम करतोच’, असे म्हटले आहे.
मात्र हे नेमके त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशूनच म्हटले आहे का? याबाबत व्हिडिओमधून स्पष्ट होत नाहीये. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सोशल मीडियामध्ये शिंदे यांनी जरांगे पाटील यांना उद्देशूनच हे म्हटले असावे अशाच चर्चा पाहायला मिळत आहेत.