Ahmadnagar Breaking : नागापूर परिसरात तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आग्रा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.
विशाल चिंतामण जगताप (वय २२, रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी), साहिल शेरखान पठाण (वय २०, रा. लेडोंळी मळा, नागापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नागापूर परिसरात संदीप ऊर्फ बाळू कमालकर शेळके (वय ४४, रा. नागापूर) यांचा खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला. तांत्रिक विश्लेषणात वरील दोघांची नावे समोर आली. त्यांच्या घरी जाऊन शोध घेतला असता ते दोन दिवसांपासून घरी नाहीत, अशी माहिती मिळाली.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. हे दोघे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे गेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी आग्रा येथून दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अहमदनगरला आणले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, रवींद्र कर्डिले, विशा दळवी, भीमराज खर्से, फुरकान शेख, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, सागर ससाणे, आकाश काळे प्रशांत राठोड, अर्जुन बडे आदींच्या पथकाने केली.
बेपत्ता झाल्याने बळावला संशय
■ खुनाच्या घटनेनंतर वरील दोघे आरोपी घरातून बेपत्ता झाले. दोन दिवस उलटूनही ते घरी आले नाहीत.
■त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आग्रा येथून अटक केली.
■पोलिसांचा संशयही खरा निघाला असून, त्यांनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.