कोयत्याचा धाक दाखवून घाटात लुटले ! कारवर टाकले मोठमोठे दगड, दोन तोळे सोने लंपास

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : कोयत्याचा धाक दाखवून चारचाकी वाहनातील प्रवाशांना लुटण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात रविवारी (दि.२५) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना असुरक्षिततेची भावना आता निर्माण झाली आहे.

रविवारी (दि.२५) रात्री पावणे दहाच्या सुमारास मल्हारी सोनवणे हे कारमधून माणिकदौंडी घाट चढत होते. कारमध्ये पत्नी सवित्रा सोनवणे, निवृत्ती गाडेकर, गायत्री गाडेकर हे होते. घाट चढत असताना चोरट्यांनी अचानकपणे कारवर मोठ-मोठे दगड टाकले.

या घटनेत दोन तोळे सोन्याचे दागिने चोर लंपास केले. मल्हारी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर पुढील तपास करीत आहेत.

काचा फोडल्या, सोने हिसकावले

मल्हारी सोनवणे यांनी कार थांबवताच समोरून तोंडाला रुमाल बांधलेले व हातात कोयते घेतलेले तीन अनोळखी इसम आले. त्यांनी कारच्या खिडकीच्या काचा फोडल्या.

त्यानंतर त्यातील सावित्रा सोनवणे, ज्योती गाडेकर यांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. आरडाओरडा करू नका. इथून निघून जा, असे म्हणून अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी तेथून पोबारा केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe