दूध अनुदानास मुदतवाढ मिळाल्याने पशुपालकांना दिलासा – विश्वनाथ कोरडे

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूधउत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचा

फेरविचार करून ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत संबंधित दुध उत्पादकांना १० मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देणारा निर्णय हा पशुपालकांच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देणारा निर्णय असल्याचे मत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना कोरडे यांनी सांगितले की, बळीराजाच्या उत्कर्षासाठी या सरकारने विविध प्रभावी योजना राबविल्या असून, राजकीय विरोधक त्याकडे दुर्लक्ष करुन शेतकरीवर्गात जाणिवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत.

कांद्याच्या निर्यातीबाबत झालेल्या निर्णयाचा पूर्णपणे अभ्यास करूनच त्याबाबत विश्लेषण करणे आवश्यक असताना केवळ विरोधासाठी विरोध करावयाचा म्हणून ऐकीव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू असून, शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या भुलथापांना बळी न पडता वास्तवावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह राज्य सरकार घेत असलेल्या शेतकरीहिताच्या भुमिकेबाबत पारनेर भाजपाच्या वतीने पारनेर येथील भाजपाच्या कार्यालयातील बैठकीत ना. विखेंसह राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठरावही सर्वानुमते पारीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सदर निर्णयाच्या अनुषंगाने पशुपालकांना अनुदान मिळण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली असून, १० फेब्रुवारी २०२४ ऐवजी ती आता १० मार्च २०२४ करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

पारनेर तालुक्यासह राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित सुधारीत निर्णयान्वये लाभ घेण्याचे आवाहनही श्री. कोरडे यांनी या वेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe