Maratha Reservation : खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार !

Published on -

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळावे म्हणून टाकळीभान येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सकल मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी काल गुरूवारी (दि. २९) प्रातांधिकारी किरण सावंत यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगसोयरे अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करावे, या मागणीसाठी मागील आठवड्यात सकल मराठा समाजाने टाकळीभान येथे रास्तारोको केला होता.

हा रास्तारोको करताना पोलीस स्टेशन, महसूल प्रशासनाची रितसर परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेतल्यानंतर सदर रास्तारोको करण्यात आला होता.

त्यावेळी १४४ कलम लागू असल्याबाबत कोणतीही पुर्वसूचना किंवा तशी नोटीस आंदोलकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आक्रमक होत प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.

सकल मराठा समाज शांततेने स्वतःच्या न्यायहक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले ५८ मोर्चे, अनेक आंदोलने, हक्काची आरक्षण लढाई लढताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आताही झालेल्या रास्तारोको मध्येही प्रशासकीय अधिकाऱ्यांना हवे असलेले सहकार्य मराठा समाज बांधवांनी केले. तरीही चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे न घेतल्यास सकल मराठा समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचे सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News