Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे यांनी विरोधातील सर्व ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे. विरोधात असताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास पालकमंत्री सत्तेत देत आहेत.
पक्षाला कळवूनही फायदा होणार नसेल तर सत्ता उलथवून टाकू व वेळ पडली तर शिर्डीतूनही लढू, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक भाजप नेते विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी विखे यांना व स्वपक्षालाही दिला.
कोल्हे यांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात व नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जाहीरपणे आक्रमकपणे विखे पाटील यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, ज्यांना जिल्ह्याचे पालकत्त्व दिले त्यांनी सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही सोबत घेऊन विकासकामे करायला हवीत. मात्र, विखे पाटील यांनी त्यांच्या विरोधातील ग्रामपंचायतींचा दलित वस्ती, जनसुविधा, पंधरावा वित्त आयोग असा सर्व निधी अडवला आहे.
जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन हा सर्व निधी ते विरोधकांना मिळू देत नाहीत. कोल्हे गटाच्या ग्रामपंचायतींचाही निधी त्यांनी रोखला. हुकूमशाही पद्धतीने त्यांचे कामकाज सुरू आहे. पक्षाच्या आदेशावरून जिल्हा बँकेत सत्ता आणण्यासाठी आम्ही काम केले.
मात्र, कर्ज मंजूर असतानाही गणेश कारखान्याची व शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत.भाजपच्या श्रेष्ठींकडेही या तक्रारी मांडलेल्या आहेत.
पक्ष दखल घेणार नसेल तर आम्हालाच बंदोबस्त करावा लागेल. अन्याय सहन करण्याची कोल्हेंची परंपरा नाही. रावणाची लंकाही खाक झाली होती, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे वेळ पडली तर कसलीही तमा न बाळगता सत्ता उलथवू, अगदी शिर्डीतही उभे राहावे लागले तरी चालेल, असा इशारा कोल्हे यांनी दिला.