Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. मार्च महिन्याची सुरुवात झाली असून आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची यादी फायनल केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी भाजप पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. हेच कारण आहे की भाजपच्या पहिल्या यादीत या जागेचा उमेदवार जाहीर केला जाणार नसल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नगर दक्षिणच्या जागेसाठी भाजपाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार देवयानी फरांदे यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते.
दरम्यान या निरीक्षकांनी गुरुवारी नगरमध्ये येऊन प्रमुख निमंत्रित शंभर पदाधिकाऱ्यांकडून या जागेवरून कोणाला उमेदवारी दिली पाहिजे याबाबतचे मत जाणून घेतले आहे.
यावेळी पक्ष निरीक्षक रवींद्र चव्हाण आणि देवयानी फरांदे यांनी एका बंद खोलीत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. दरम्यान नगर दक्षिणच्या लोकसभा जागेसाठी यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तीन नावांचा आग्रह धरला होता.
यामध्ये वर्तमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड यांचा समावेश आहे.
दरम्यान याबाबतचा अहवाल भाजप पक्ष निरीक्षक म्हणून काम पाहत असलेले रवींद्र चव्हाण आणि देवयानी फरांदे यांनी प्रदेश भाजपाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आता हा अहवाल भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार आहे. मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत नगर दक्षिणच्या उमेदवाराचा समावेश राहणार नाही असा अंदाज राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
यामुळे, भाजपाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी या तिन्ही नेत्यांमधून कोणाचा नंबर लागतो, या जागेसाठी कोणाला तिकीट मिळते हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. परिणामी आता भाजपच्या उमेदवारांच्या यादीकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहे.