वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यातील २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्राकडे मागणी

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि.२३ :- वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असुनही केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमधील १५ टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांच्याकडे केलेली आहे.

श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, शासनाने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररित्या कमी केले तर ते उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६६,३३३ जागांमधून केंद्रीय कोट्यातील १५ टक्के प्रमाणे ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा आरक्षित असायला पाहिजे परंतु केवळ ३७१ जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत.

ही टक्केवारी केवळ ३.८ टक्के एवढी आहे. त्या खालोखाल १३८५ जागा एस.सी (१५ टक्के) व  ६६९ (७.५ टक्के) जागा एस.टी ला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत.

तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय कोट्यातून ७ हजार १२५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची  टक्केवारी ७३.७ टक्के एवढी असल्याचे श्री. भुजबळांनी निदर्शनास आणुन दिले आहे.

मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी २७ टक्के, एस.सी १५ टक्के व एस.टी ७.५ टक्के असे घटनात्मक आरक्षण आहे.

परंतु आरक्षणाचे सर्वनिकष, सुचना तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून  केंद्रीय  मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ३७१ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत.

ओबीसींच्या वाट्याच्या २२०७ जागांसह एकुण ७ हजार १२५ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे भुजबळांचे म्हणणे आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देवून महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या २ हजार ५७८ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी श्री. भुजबळ यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment