Ahmednagar News : राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाल्याने प्रवासी व नागरिक वैतागून गेले होते. गॅस पाईपलाईचे खोदकाम व लग्न तिथी दाट असल्यामुळे ही गर्दी झाली .
राहुरी येथील नगर- मनमाड राज्य मार्गावर काल सकाळपासून दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात शहरात राज्य मार्गावर एका बाजुने गॅस पाईप लाईनचे खोदकाम सुरू असून हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.
त्यामुळे त्याचा अडसर तसेच रविवार त्यात लग्न तिथी दाट असल्याने वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस खात्याकडे कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नाही. त्यात काही पोलीस कर्मचारी राहुरी- सोनई फाट्यावर हप्ता वसुलीवर अधिक लक्ष देऊन असल्याने शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यास अजिबात वेळ मिळत नाही.
नेहमी वर्दळीच्या ठिकाणी मुख्य चौकात बस स्थानक चौक, बारागाव नांदूर चौक, पाण्याच्या टाकीच्या चौकात ट्रॅफिक नियंत्रक कधीही सापडत नाही. पाण्याच्या टाकीच्या चौकातही उभे असलेले वाहतूक नियंत्रक हप्ते वसुली करण्यात मग्न असतात. यावर पोलीस निरीक्षकांना लक्ष घालण्यासाठी वेळ मिळेल का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील रोजच्या वाहतुकीला नागरिकांसह सारेच वैतागल्याचे चित्र आहे. विशेष करून शनिवारी, रविवारी पाण्याच्या टाकीपासून बारागाव नांदूर रस्त्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे.
परिणामी शहर वासीयांसह वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर कोण तोडगा काढणार? असा सवाल शहरवासीयांतून व वाहन चालकांकडून विचारला जात आहे.