Nagar News : उन्हाळयाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणा…

Ahmednagarlive24 office
Published:
Nagar News

Nagar News : नगर तालुक्यातील वेगाने विकसीत होत असलेले चिचोंडी पाटील या गावाला उन्हाळयाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणार आहे.

चिचोंडी पाटील गावाला केळ तलावातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. तलावातून उचललेले पाणी चिचोंडी गावात उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण यंत्रणेव्दारे गावात वितरीत केले जाते.

सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले, विहीरींचे पाणी कमी झाले असून इतर स्रोत देखील कोरडे पडत आहेत. परिसरात पाणी नसल्याने तसेच केवळ या तलावात पाणी उपलब्ध असल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी या तळ्यात वीजपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला आहे.

त्यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने घटत चालला आहे. परिणामी गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याबाबत चिचोंडी ग्रामपंचायतच्यावतीने पाटबंधारे विभागास यापूर्वीच वारंवार लेखी पत्र देवून तलावातील पाणीउपसा बंद करण्याबाबत तसेच या भागातील वीजपुरवठा खंडीत करून या तलावावर कर्मचाऱ्याची नेमणूक करून पाणी उपसा बंद करण्याबाबत सुचीत केले होते.

मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केल्याने आजमितीला तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, तो जेमतेम महिनाभर पुरू शकतो. त्यानंतर मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागणार आहे.

जर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचातने यापूर्वीच वेळोवळी दिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेवून पाणीउपसा रोखला असता तर आज तलावात पुरेसे पाणी उपलब्ध असते व नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नसती.

शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून चिचोंडी पाटील गावाला नैसर्गिक पद्धतीने शुध्द पाणी पुरवठा केला जावा यासाठी जलशुधदीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र आता तलावातच पाणी नसल्याने ही यंत्रणा धुळखात पडेल.

एकीकडे शासन नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून जलशुधदीकरण यंत्रणा बसवते. मात्र अधिकारी मात्र मुख्य हेतूलाच फाटा देतात.

आज मितीला चिचोंडी पाटील या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या केळ तलावात केवळ एक महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हे पाणी संपल्यानंतर नागरिकांना पूर्णपणे करच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. दरम्यान या तलावातून होत असलेला पाणीउपसा रोखण्याबाबत पाटबंधारे विभागास वेळोवेळी लेखी पत्र ग्रामपंचायकडून दिले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe