मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा विस्तार झाल्यास कोकणातील प्रवाशांची होणार गैरसोय

Published on -

Maharashtra News : मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणाचा विचार रेल्वे बोर्डाकडून सुरू आहे.

मंगळुरू- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस बंद करून त्याऐवजी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला मंगळुरूपर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. मात्र, कोकण विकास समितीने याला जोरादार विरोध केला असून समितीने याबाबतचे पत्र रेल्वेमंत्री आणि कोकण रेल्वे प्रशासनाला पाठविले आहे.

सध्या ट्रेन क्रमांक २२२२९/ ३० वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते मडगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सेवा देते असून या गाडीला ९८ ते १०० टक्के भारमानासह प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. मुंबई-मडगाव वंदे भारतला १६ डब्यांच्या रेकची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, ते न करता उलट मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेनचा विस्तार मंगळुरूपर्यंत करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. असे झाल्यास मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोवा विभागातील प्रवाशांना पुरेसा आरक्षण कोटा मिळणार नाही.

कोकणातील प्रवाशांची गैरसोय होईल. दरम्यान, मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (वेळा आणि आरक्षण कोटा) मध्ये बदल न करता ट्रेन क्रमांक २०६४५/ ४६ मंगळुरू मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस एक वेगळी सेवा म्हणून मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात यावी.

याशिवाय मंगळुरू मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करून आणि सध्याच्या मुंबई-मडगाव वंदे भारत जेथे थांबत नाही, अशा स्थानकांवर थांबे देऊन मुंबई-गोवा आणि मुंबई-मंगळुरु या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना स्वतंत्र सेवा देता येईल. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती कोकण विकास समितीकडून देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe