Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणूक आता अगदीच तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याअंतर्गत ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या बूथवर लहान बाळांसाठी पाळणाघराची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
साधारण पुढील आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
यात मतदारांना पिण्याच्या पाण्यासह ओआरएसची सोय, तब्येत बिघडली तर डॉक्टरची सोय करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मतदानासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रांवर आल्यावर आपण एखाद्या उत्सव किवा समारंभाला आलो आहोत
असा अनुभव यावा अशा पद्धतीने केंद्र सजविण्याची सूचना करण्यात आली असल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव अधिक आनंदाने साजरा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
मतदान केंद्रांवर या असतील सुविधा
– प्रवेशद्वारावर मतदार सुविधा पोस्टर्स, केंद्र दर्शविणारी चिन्हे, मतदार साह्य केंद्रांची सोय.
– स्त्री आणि पुरुष मतदारांची स्वतंत्र रांग.
– मतदानाच्या दोन दिवस आधी व्होटर स्लिपचे वाटप.
– मतदानाच्या दिवशी बूथनिहाय अधिकाऱ्यांची उपस्थिती.
– पाळणाघराची सोय.
– दिव्यांगांच्या सोयीसाठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नियुक्त्ती.
– गर्दी नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त.
– पार्किंग, पिण्याचे पाणी, मोबाइल टॉयलेटची सुविधा.
जिल्ह्यात ३ हजार ७३१ मतदान केंद्रे
जिल्ह्यात अहमदनगर व शिडीं असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघात मिळून ३६ लाख ११ हजार मतदारांची संख्या आहे. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण ३ हजार ७३१ मतदान केंद्रे आहेत.