Electric Bus : मुंबईत धावणार २५० इलेक्ट्रिक बसेस ! ‘हा’ नवीन कंत्राटदार करणार बसेसचा पुरवठा

Ahilyanagarlive24 office
Published:

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३ हजार बसेस स्वमालकीच्या असायला हव्यात, हे बेस्टचे धोरण आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाने हे धोरण बाजूला ठेवत जलद व वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अधिकाधिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी बेस्टला २५० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे आणखी एक नवीन कंत्राटदार बेस्टला उपलब्ध झाला आहे.

हरयाणा येथील पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन कंपनीमार्फत १२ मीटर लांबीच्या २५० बस गाड्या घेतल्या जाणार आहेत. या बस गाड्या येत्या तीन महिन्यांत टप्याटप्याने दाखल होणार आहेत.

बेस्ट उपक्रमाचे माजी व्यवस्थापक विजय सिंगल यांनी या करारास मान्यता दिली आहे. या कंपनीस २४०० बस गाड्यांचा पुरवठा करण्याचा करारही त्यांनी संमत केला. त्यामुळे येणाऱ्या काळात बेस्ट उपक्रमाचा बस ताफा वाढणार आहे.

बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीच्या बसेसचा ताफा दिवसेंदिवस कमी होत आहे. जुन्या बस भंगारात काढल्याने बसेसची संख्या कमी झाली आहे. प्रवाशांच्या तुलनेत गाड्यांची कमतरता असल्याने प्रशासनाला काही मार्ग नाईलाजास्तव रद्द करावे लागले आहेत.

कंत्राटदारांकडून लवकरात लवकर बस गाड्या घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तगादा लावला आहे. सध्या मातेश्वरी कंपनीकडून २०० सीएनजी बसेस, ओलेक्ट्रा कंपनीकडून २१०० इलेक्ट्रिक बसेस, स्विच मोबिलिटीकडून २०० दुमजली इलेक्ट्रिक बसेस व कॉसिस कंपनीकडून ७०० दुमजली बस घेण्याचे करार याआधीच समंत झाला आहे.

मात्र, या नवीन बस गाड्या येण्याचा वेग लक्षात घेऊन दुसरा पर्याय म्हणून बेस्टने आणखी दोन करारास मान्यता दिली आहे. त्यात पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन कंपनीचा समावेश झाला आहे.

२५० बसेसचा पुरवठा करण्यात येणार असून, एक बस चार्जिंग केल्यानंतर १८० किलोमीटर धावणार आहे. तसेच ३० ते ४० मिनिटात एक बस चार्ज होणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe