Maharashtra Politics News : भारतात 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत आता भारतात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि तेव्हापासूनच आचारसंहिता लागेल अशी शक्यता आहे.
अशा या परिस्थितीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार असे वृत्त समोर आले आहे. कारण की, उबाठा शिवसेनेला लवकरच एक मोठा नेता सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा आहेत.

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या गटाला जय महाराष्ट्र म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील वायकर यांची अलीकडेच ईडीने सखोल चौकशी केली होती. त्यांच्यावर जोगेश्वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याचा आरोप झाला आहे.
याबद्दल त्यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुद्धा सुरू केली आहे. विशेष बाब अशी की या प्रकरणात त्यांची अडचण वाढली आहे. त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असं म्हणतात की आमदार वायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खूपच निकटवर्तीय आहेत. पण आता ठाकरे यांचा हा जवळचा माणूस लवकरच एकनाथ शिंदे यांचा गट जवळ करणार असे बोलले जात आहे.
वायकर यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सुद्धा भूषविले होते. दरम्यान, ठाकरे व वायकर कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
जोगेश्वरीमध्ये राखीव भूखंडावर वायकर यांनी आधी क्लब व नंतर हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते. यातून वायकर यांनी पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचबाबत त्यांची सध्या ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान त्यांना ठाकरे गटाची साथ सोडल्यास ईडीच्या चौकशीत मदत करण्याचे आश्वासन मिळाले असावे, यामुळेच की काय अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आधीच्या भूमिकेत बदल करून वायकर यांना मदत होईल अशी मवाळ भूमिका घेतली आहे. यामुळे तेव्हापासून वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा आहेत.
तथापि, याबाबत अजूनही वायकर यांनी अधिकृत निर्णय घेतलेला नाही. प्रसारमाध्यमांनी मात्र जेव्हा त्यांना या संदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे आता ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा जवळचा माणूस एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.