Madhi Yatra Ahmednagar : मढी यात्रेस यंदा पोलिस बंदोबस्त नाही ! दुष्काळामुळे पाणी टंचाईचे सावट

Ahmednagarlive24 office
Published:

Madhi Yatra Ahmednagar : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय कर्मचारी पोलिस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देता येणार नाही.

देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ अशी माहिती प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत अशी पंधरा दिवस चालते. राज्यासह शेजारील राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊन विविध धार्मिक विधी करतात. तीन टप्यात चालणाऱ्या यात्रेचा रंगपंचमी हा मुख्य दिवस असतो.

यात्रा कालावधीमध्ये यात्रेवर प्रशासनाचे नियंत्रण असते. विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांसह देवस्थान समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक मढी येथे कानिफनाथ गडावर संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी प्रसाद मते होते.

यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे यासह परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, वनविभाग, वीज वितरण, नगरपालिका अशा प्रमुख यंत्रणाचे प्रतिनिधी, सरपंच संजय मरकड, बबन मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे,

सचिव विमलताई मरकड, भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाट, सचिन गवारे, डॉ. विलास मढीकर, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, डॉ. रमाकांत मडकर ग्रामपंचायत सदस्य भानूविलास मरकड, पोपट घोरपडे, चंद्रभान पाखरे आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले की, ग्रामपंचायत व देवस्थान हद्दीत व्यावसायिकांसाठी देण्यात येणाऱ्या जागा रस्ता सोडून द्याव्यात. मच्छिद्रनाथ व तिसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकही दुकानाला जागा देऊ नये. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत पार्किंग व्यवस्था करावी.

होळी, रंगपंचमी व फुलोरबाग या मुख्य व भाविकांच्या गर्दीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. समाजकंटक, चोर, खिसेकापू आदींपासुन भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवला जाईल असे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रा कालावधीत प्रचंड गर्दीमुळे मोबाईलटॉवरवर ताण पडून भाविकांचे मोबाईल बंद पडून संपर्क तुटतो. त्यामुळे संबंधित कंपनीला कळवून ठिकठिकाणी मोबाईल टॉवरच्या व्हॅन उपलब्ध कराव्यात.

पाणी टंचाईचे सावट

दुष्काळामुळे मढी यात्रेवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून, ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यात्रेसाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने टैंकर उपलब्ध करून द्यावेत. टँकरचे पाणी परिसरातील विहिरीत व टाक्यामध्ये सोडून भाविकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe