Leopard Attack : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Published on -

Leopard Attack : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकरुखे गावात गावठाण हद्दीत राहात असलेले रामराव लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या शेळ्या रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या गोठ्यात बांधल्या.

सुमारे रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते गोठयाजवळ गेले असता त्यांना समोर बिबट्याने एका पाठोपाठ तीन शेळ्यांवर हल्ला करत असल्याचे दिसले.

त्यानंतर त्यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला; परंतु या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात एक गाभण व दोन दुभत्या शेळ्या जागीच ठार झालेल्या होत्या.

घटनास्थळी वनसंरक्षक संजय साखरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निर्मळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. सध्या ऊस तोडणी चालु झाली असल्याने उसात लपलेले बिबटे हे मानवी वस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत.

याठिकाणी असलेल्या ग्रामस्थांना दररोज कुठे ना कुठे दर्शन होत असून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच एकरखे गावातील शेतकरी नामदेव रंगनाथ सातव याच्या शेतातील बांधाच्या झाडाझुडपात दोन बिबट्या प्राण्यांची मृत अवस्थेतील दोन लहान बछडे आढळून आली.

गेल्या सात, आठ वर्षांपासून या भागात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. वनविभागाने या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News