Ahmednagar News : बळकवलेली जागा पुन्हा मिळावी,यासाठी प्रयत्न करूनही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलेने थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंगळसूत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.
शहरातील मालदाड रोड परिसरात राहणाऱ्या रेखा विनोद सातपुते या महिलेने हे पाऊल उचलले आहे. सदर महिलेच्या परिवाराची जागा मालदाड रोड परिसरात आहे. सदर जमीन त्यांना वारसाने मिळालेली आहे.
या जागेला सातपुते कुटुंबीयांनी कर्ज काढून कंपाउंड केले होते. या जागेवर त्यांनी आपल्या नावाची पाटी लावली होती. ६ मार्च रोजी दुपारी काही इसमानी जागेचे कंपाऊंड तोडले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मात्र पोलिसांनी संबंधितावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सदर महिन्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. या निवेदनात सोबतच स्वतःचे मंगळसूत्र ही पाठविले आहे.
आमच्याकडे पोलीस यंत्रणा अथवा कोणास देण्यासाठी पैसे नाही. जमीन परत मिळण्यासाठी माझे राहिलेले शेवटचे मंगळसूत्र अर्जासोबत पाठवत आहे, असे या निवेदनात सदर महिलेने म्हटले आहे.