Ahmednagar Politics : नगरच्या कार्यकर्त्यांचा नादच खुळा ! ‘या’ आमदाराच्या समर्थकाने प्रचारासाठी घातला दोन हजार कोटींचा शर्ट

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आजकालचे राजकारण व राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यात मोठा बदल झालाय. साधे नेते व त्यांचे साधेभोळे कार्यकर्ते दिसणे आता दुर्मिळच झाले आहे. पण आपल्या नेत्यासाठी काहीपण करण्याची वृत्ती मात्र कार्यकर्त्यांची आजही कायम आहे.

काही कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी, नेत्याच्या प्रचारासाठी काय भन्नाट कल्पना लढवतील हे सांगणे मुश्किल. सध्या सोन्याचा शर्ट, ब्रासलेट, साखळ्या घालून चर्चेत आलेले अनेक कार्यकर्ते आपण पाहिजे असतील.

परंतु गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील युवकाने बनविलेल्या २ हजार ९०० कोटी रुपयांचा शर्ट सध्या राज्यात चर्चेचा विषय झाला आहे.

सोशल मीडियावरही या शर्टची जोरदार चर्चा आहे. हा शर्ट परिधान करणारे आहेत आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक सचिन गवारे. गवारे हे कोपरगाव शहरातील गवारे नगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी कापड प्रिंट करून शर्ट शिवून घेतला.

हा शर्ट २९०० कोटी रुपयांचा असल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. या शर्टचे नेमके गमक काय आहे. तो २९०० कोटी रुपयांचा कसा, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. परंतु हा शर्ट सचिन गवारे यांच्या अंगात पाहिल्यावर प्रश्नाचे उत्तरही तात्काळ मिळून जाते.

काय आहे नेमकी ‘या’ शर्टची खासियत ?

आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या साडेचार वर्षात २९०० कोटी रुपयांची विकास कामे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात केली आहेत. वेळोवेळी आणलेल्या निधीच्या, भूमिपूजन व उद्घाटनांच्या बातम्या सचिन गवारे यांच्या शर्टवर प्रिंट करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे या शर्टची किंमत दोन हजार ९०० कोटी असल्याचे सचिन गवारे यांचे म्हणणे आहे. सचिन गवारे कोपरगाव शहरात फिरतात, एखाद्या दुकानावर थांबतात तेव्हा महिला-पुरुष कुतूहलाने त्यांच्या जवळ येतात, त्यांच्या शर्टचे निरीक्षण करतात.

त्यावर किती विकासकामे केली, याची माहिती देतात. त्यामुळे सध्या हा समर्थक व त्यांचा अनोखा २ हजार कोटींचा शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe