अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. संग्राम जगताप व आ. दत्ता भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
आ. जगताप यांनी कार्यकत्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी नगरच्या नामांतरासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, असे करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या वतीने तसेच सर्व धनगर समाजबांधव आणि सर्व संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे.
या पार्श्वभूमीवर आज (दि.१३) होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा नामकरणाचा विषय घेऊन मंजूर करण्यात यावा. या वेळी आ. संग्राम जगताप, आ. नितीन पवार, सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या कार्यक्रमात नगरच्या नामांतराची अहिल्यादेवीनगर अशी घोषणा करण्यात आली होती.