Ahmednagar News : कोपरगाव शहरातील गावठाण भागातील बाजारतळावर भरणारा बाजार सोमवारी मुख्य रस्त्यावर भरवण्यात आला. नगरपरिषदेने तसेच मुख्य अधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर फलकाद्वारे भाजी विक्रेत्यांनी राघोजी भांगरे ओट्यावर बाजार भरवावा म्हणून आवाहन केलेले असताना, त्याला अक्षरशः वाटण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या.
पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भर रस्त्यात बाजार भरला होता. त्यामुळे वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही प्रथा वर्षानुवर्ष सुरूच आहे. त्यावर कोणताही तोडगा काढण्यात पालिकेला यश आलेले नाही.
कोट्यावधी रुपये खर्चून बाजारतळ भागात राघोजी भांगरे भाजीपाला व्यापार संकुल उभारले आहे; परंतु अक्षरशः तेथे भाजीविक्रेते कोणीही बसत नाहीत. मद्यपी व इतर अवैध व्यवसाय या भागात रात्री चालतात.
त्याबद्दल विविध नगरसेवकांनी सामाजिक कार्यकत्यांनी आंदोलने केली; पण काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या वतीने पोलीस ठाण्याजवळ सर्व भाजीपाला विक्रेते, व्यापारी व नागरीकांना कळविले की,
कोपरगाव शहरातील बाजारतळ श्री लक्ष्मी आई मैदानावर महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार असल्याने शहराचा आठवडे बाजार दि. ४ मार्चपासून पुढील आठवडे बाजार आद्यक्रांती गुरु राघोजी भांगरे (नवीन बाजार ओटे) या ठिकाणी स्थलांतरीत केला आहे. त्यामुळे कोणतेही भाजीपाला विक्रेते, व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी शहरात इतरत्र कोठेही रस्त्यावर बसू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री लक्ष्मी आई मैदानावर महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार असल्याने शहराचा आठवडे बाजार हा दि. ४ मार्चपासून आद्यक्रांती गुरु राघोजी भांगरे (नवीन बाजार ओटे) या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे.
त्यामुळे कोणतेही भाजीपाला विक्रेते, व्यापारी, किरकोळ विक्रेते यांनी शहरात इतरत्र कोठेही रस्त्यावर बसू नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.