Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वाळूतस्करीच्या घटना, वाळू तस्करांची दहशत आदी घटना काही नवीन नाहीत. महसूल विभागाकडून अनेकदा यावर विविध उपाययोजना देखील होतात.
परंतु वाळूतस्करी किंवा वाळू तस्करांची मुजोरी काही कमी होताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे वाळूतस्करांनी कामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुधवार दि. १३ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चंदनापुरीच्या कामगार तलाठी रत्नप्रभा गागरे यांनी दिलेल्या माहितीवरून,
आदल्या दिवशी मंगळवारी सकाळी तहसीलदार धीरज मांजरे यांना गोपनीय माहिती समजली की चंदनापुरी येथे भरदिवसा वाळूचा टेम्पो भरून चालला आहे.
त्यावर कारवाई करण्याचे थेट आदेश दिले. त्यानुसार आम्ही चंदनापुरी येथे थांबलो असता तोपर्यंत तो टेम्पो पुढे गेला होता. आम्ही त्याच्या मागे जात सावरगाव तळपर्यंत पाठलाग केला. परंतु संबंधित वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास माझ्यासह कोतवाल कैलास भालेराव व दत्तू गुळवे असे थांबलेले होतो. त्याचवेळी नऊ वाजेच्या सुमारास एक वाळूचा टेम्पो भरधाव वेगाने आला.
सदर टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुजोर वाळूतस्करांनी न जुमानता उलट अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. पुढे तो भरधाव वेगातच सावरगाव तळच्या दिशेन निघून गेला.
सदर वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे. याबाबत तहसीलदार यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यावरुन पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. दरम्यान, या वाळू तस्करांच्या मुजोरीवर कायमस्वरूपी आला घालण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.