Ahmednagar News : येथील बहुचर्चीत रत्नदिप कॉलेज ऑफ फार्मसी संस्थेचे अध्यक्ष, डॉ. भास्कर मोरे याला भिगवन (इंदापूर) येथे अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १३) करण्यात आली.
डॉ. मोरे याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात विद्यार्थीनीचा विनयभंग व अन्य एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. डॉ. मोरे यास अटक करण्यात यावी यासाठी रत्नदिप फार्मसी कॉलेजच्या विद्याथ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा बुधवार हा नववा दिवस आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टिमने डॉ. मोरेला भिगवन येथे जेरबंद केले. दरम्यान,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांना भेट घेवून त्यांना पाठींबा दर्शविला. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, आरोपीला अटकच केली जाईल, असे आश्वासन राज्यकर्त्यांनी दिले.
दरम्यान तालुक्यातील रत्नपूर येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, या भास्कर मोरे यांच्या कॉलेजची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
जामखेड येथील रन दीप मेडिकल फाउंडेशन रिचार्ज सेंटर या संस्थेचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्या विरोधात गेल्या नऊ दिवसांपासून चाललेल्या आंदोलनाची आज विधान परिषदेचे आमदार आमदार प्रा. राम शिंदे यांनी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर येऊन आंदोलनकर्ते पांडुराजे भोसले व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन माहिती घेतली.
सदर कॉलेजच्या कथित गैरव्यवहारांची व संबंधित कॉलेजची एसआयटीमार्फत चौकशी लावून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी आ. शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित संस्थेची उच्चस्तरीय चौकशीची समिती गठीत करून एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले व विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरून दिले.
तसेच आ. शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावून विद्यार्थ्यांशी बोलणे करून दिले असता, ना. मुश्रीफ यांनी डॉ. मोरे यांच्या सातही कॉलेजची मान्यता दोन दिवसांत रद्द करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना व विद्यार्थ्यांना दिले. गेल्या नऊ दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशन विरोधात तसेच भास्कर मोरे याला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांचे उपोषण सुरूच आहे.
आज जामखेड तालुक्यातील मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने या घटनेचा निषेध करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला तसेच या कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री व उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. मोरे याचे रिवॉल्व्हरचे लायसन रद्द करण्याच्या सूचना पोलीस अध्यक्ष राकेश ओला यांना दिल्या आहेत, विद्याथ्यर्थ्यांच्या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.
तसेच रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या आवारात वनविभागाला मृत हरणाचे काही अवशेष सापडले असून, हे अवशेष नागपूर येथे फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत, त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये मोरे दोषी आढळल्यास खडी फोडण्यापेक्षाही हा मोठा गुन्हा आहे, अशा शब्दांत आ. राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासित केले.
या वेळी शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, केदार रसाळ, नगरसेवक अमित चितामणी,
माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक पवनराजे राळेभात, मनोज कुलकर्णी, अॅड. प्रविण सानप, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, आदी उपस्थित होते. दरम्यान, जामखेड येथील मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने या आंदोलनकर्त्याची भेट घेण्यात आली.
या वेळी पंच कमिटचे अध्यक्ष हजी अझहरभाई काझी, मुक्तारभाई सय्यद, हाजी नाजीमभाई काझी, ईस्माईल सय्यद, हाजी जावेद बागवान, हाजी मुजुरभाई सय्यद, ईस्माईल शेख, यांच्यासह सदस्य उपस्थित होते.