Ahmednagar News : यंदाच्या हंगामात शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जेमतेमच पाऊस झाल्यामुळे जमिनीवरील बहुतांश पाणीसाठे पूर्णक्षमतेने भरू शकले नाहीत, त्यामुळे भूजल पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकली नसल्याने
मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. परिसरातील तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव कृषी मंडळातील वरखेड, बेलगाव, मंगरुळ, अंतरवली, रानेगाव, शिंगोरी, दिवटे, लाडजळगाव, गोळेगाव, नागलवाडी आदी परिसरात मोजकाच पाऊस झाल्याने खरीप हंगामातील कापूस, तुर, बाजरी, आदी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली.
तसेच पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात चारा पिके व रब्बी पिकांची लागवड करण्यात आली. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठल्यामुळे हा हंगाम संकटात सापडला आहे.
पावसाळा सुरू होण्यास बराचसा कालावधी जाणार आल्याने उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा मुकाबला येथील नागरिकांना करावा लागण्याचे चित्र तयार झाले आहे. शेवगाव पाथर्डी प्रादेशिक नळयोजनेद्वारे होत असलेला पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने
नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबतीत प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.