Ahmednagar News : आशुतोष काळे यांनी पर्यटन विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून शहरातील राघोबादादांच्या वाड्यासाठी सव्वा सात कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने कोपरगावच्या इतिहासाच्या पुसट होत असलेल्या पाऊलखुनांना उजाळा मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोपरगावला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. देवगुरू पुत्र कचेश्वर, दानवांचे गुरू व संजीवनी मंत्राचे निर्माते ऋषी शुक्राचार्य आणि देवयानी यांच्या समाधी गोदातटी असून ऐतिहासिक घटनांच्या साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू मतदार संघात आहेत.
त्यापैकी कोपरगाव शहरातील जुनी मामलेदार कचेरी म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण अर्थात राघोबाबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा. हा वाडा मोडकळीस येवून हा ऐतिहासिक ठेवा अखेरच्या घटका मोजीत होता.
त्याची आ. काळे यांनी दखल घेवून या वाड्याच्या संवर्धनासाठी निधी मिळविला आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटनाला देखील तेवढेच महत्व आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूला उर्जितावस्था प्राप्त होवून ऐतिहासिक स्थळाच्या निर्मितीतून पर्यटनाला चालना मिळावी व त्या माध्यमातून बाजारपेठेला आर्थिक उभारी मिळावी हा त्यांचा उद्देश आहे.
आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असतांना देखील देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे. पुरातन स्थळे, मंदिरांचे ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, त्यांचे संवर्धन करून पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे गरजेचे आहे.
ही स्थळे जागतिक पटलावर आल्यास पर्यटनवृद्धी होईल. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होत असते. आ. आशुतोष काळेंच्या दैदिप्यमान कामगिरीच्या बळावर विकासाच्या बाबतीत संपूर्ण कोपरगाव मतदार संघाने कात टाकली आहे. विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत कोपरगावच्या संस्कृतीच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेली ऐतिहासिक स्थळे कोपरगावकरांच्या स्मृतिपटलावरून नामशेष होणार नाही, याची काळजी घेवून आ. काळे यांनी ऐतिहासीक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी ७.२७ कोटी निधी आणल्यामुळे कोपरगावच्या इतिहासाला पुन्हा झळाळी मिळणार आहे.
कोणत्याही अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत असताना आ. काळे यांनी मतदार संघाच्या विकासा बरोबरच पर्यटकांची कोपरगावच्या भूमिकेकडे पावले वळविण्यासाठी ऐतिहासीक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनाचा घेतलेला निर्णय कोपरगावच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामुळे समस्त कोपरगावकर व इतिहासप्रेमींनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.