Ahmednagar News : मोटारसायकल खरेदी विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची, असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला चोरटा तसाच मोटारसायकल घेऊन पसार झाला.
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे नुकतीच ही घटना घडली आहे. या घटनेबाबत काल गुरूवारी (दि.१४) राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल डॅनियल शेंडगे हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून त्यांचे राहुरी फॅक्टरी कारखान्याच्या पंपासमोर साई अँटो नावाने गाड्या खरेदी विक्री व सर्व्हिसिग गॅरेज आहे. (दि.२९) फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सुनिल शेंडगे यांच्या साई अँटो गॅरेज तेथे एक अनोळखी भामटा त्याच्या ताब्यातील एम.एच. १६ पी- ९१४७ क्रमांकाची अॅक्टिव्हा गाडी घेवून आला.
आणि सुनिल शेंडगे यांना म्हणाला की, मोमीन आखाडा येथील असून मला सेकंड हॅन्ड गाडी घ्यावयाची आहे. तुमच्याकडची मोटारसायकल मला आवडली, मी चक्कर मारून पाहतो, असे सांगून तो सुनिल शेंडगे यांच्याकडे विक्रीस असलेली बजाज कंपनीची एम.एच. १९ सीएन. ८२२१ क्रमांकाची प्लॅटिना मोटारसायकल चक्कर मारण्यासाठी घेऊन गेला.
तो परत न येता तसाच पसार झाला. तेव्हा सुनिल शेंडगे यांनी थोडा वेळ वाट पाहिली, पण तो परत आला नाही. तेव्हा शेंडगे यांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळुन आला नाही. तसेच त्या चोरट्याची अद्याप पर्यंत वाट पाहिली,
परंतु त्याने गाडी परत आणुन दिली नाही. त्यामुळे गाडी चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर सुनिल डॅनियल शेंडगे यांनी काल गुरूवारी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.