Maharashtra All District Voting Date : गेल्या काही दिवसांपासून निवडणुक आयोग आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणा केव्हा करणार ? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. सर्वसामान्य मतदारांना देखील याची आतुरता लागलेली होती. पण, मतदारांची ही आतुरता आता समाप्त झाली आहे. आज भारतीय निवडणूक आयोगाने आगामी 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे.
यामुळे आता सर्वांना आतुरता लागली आहे ती मतदानाच्या दिवसाची. आमच्या मतदारसंघात केव्हा मतदान होणार ? हा मोठा प्रश्न आहे. यामुळे आज आम्ही आपल्या मतदारांसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारासंघांमध्ये कोणत्या चरणात मतदान होणार, मतदानाची तारीख काय राहणार याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे निवडणूक आयोगाला वेळेत अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. यानुसार आज भारतीय निवडणूक आयोगाने देशातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आता खऱ्या अर्थाने लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. मतदाराजा आता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेत मतदान करणार आणि आपल्या आवडीच्या लोकप्रतिनिधींना नियुक्त करणार आहे. दरम्यान, आता आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी किती चरणात मतदान होणार, कोणत्या मतदारसंघात केव्हा मतदान होणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान होणार
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात मतदान होईल आणि या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे 26 एप्रिलला होईल आणि यात राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे ला होईल, यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे ला होणार आहे, यात राज्यातील एकूण 11 मतदारसंघात मतदान होईल. पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे, यात राज्यातील 13 मतदारसंघात मतदान होईल.
तुमच्या मतदारसंघात मतदान कधी होईल
- 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होईल.
- दुसऱ्या टप्प्यात राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे.
- 7 में ला तिसऱ्या टप्प्याचे मतदान होईल आणि या टप्प्यात राज्यातील रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होईल.
- 13 मे 2024 रोजी राज्यातील नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्यासाठी मतदान घेतले जाणार आहे.
- 20 मे ला राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघात मतदान होईल. हा मतदानाचा पाचवा टप्पा असेल. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील मतदान पूर्ण होईल.