Ahmednagar breaking : जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने ३ आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ मे २०१५ रोजी ७ वाजता दाखल झालेल्या एका पोक्सोच्या गुन्ह्यात मुळ फिर्यादीला तक्रारदाराने आरोपींविरूद्ध मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी निवृत्ती भाऊसाहेब कजबे,
सखाराम भाऊसाहेब कजबे (दोघे रा. धनगरवाडी ता. नेवासा), राहुल नवनाथ पाटोळे (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावास कुऱ्हाड, लोखंडी पाईपच्या सहाय्याने जबर मारहाण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून वरील आरोपींविरूद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक एस. जी. जोशी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यात चौकशीकामी सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणात फिर्यादी, डॉक्टर व जखमी साक्षीदार यांचे जबाब, पुरावा महत्वाचा ठरला. सरकारी पक्षातर्फे सादर साक्ष, पुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपीस दोषी धरून ही शिक्षा सुनावली.
न्यायालयाने सर्व आरोपींना गुन्हयात दोषी धरून ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा तसेच दुसऱ्या गुन्ह्यात ३ महिने व प्रत्येकी १ हजाराच्या दंडाची शिक्षा तर तिसऱ्या गुन्ह्यात ३ महिने कारावास व प्रत्येकी १ हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी ३० हजार रुपये जखमी साक्षीदारास देण्याचे आदेश दिले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता चंद्रकांत दिनकरराव सपकाळ यांनी काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. के. भोर्डे यांनी सहकार्य केले. त्यांना पैरवी अधिकारी ए.एस.आय. नरेश चव्हाण, पो. कॉ. सुभाष हजारे यांचे सहकार्य लाभले.