Milk Subsidy : गेल्या ५ ते ६ महिन्यापासून राज्यामधील दूधाचे दर कोसळलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ५ रुपये अनुदान सुरू केलेले आहे. म्हणून म्हणून जोपर्यंत दुधाला नैसर्गिकरित्या भाव वाढ मिळत नाही.
तोपर्यंत ५ रुपये अनुदान सुरूच ठेवावे, अशी मागणी ग्रामविकास मंचचे समन्वयक शिवाजी खुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात खुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात गेल्या ५ ते ६ महिन्यापासून दूधाचे भाव कमालीचे कोसळलेले आहेत. त्यामुळे दूधाला योग्य भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक व शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केल्यामुळे सुरुवातीस सरकारने (दि. ११) जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत ५ रुपये अनुदान दिले होते.
परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये दूध भाव वाढ न झाल्यामुळे सरकारने पुन्हा त्यास १० मार्चपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. सदरची मुदत संपल्यामुळे सरकारने ५ रुपये अनुदान बंद केले आहे.
नैसर्गिकरित्या अद्याप दूधाचे भाव वाढलेले नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायाकडे वळलेला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून राज्यातील सर्व शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. सध्या पडलेला दुष्काळ, भेडसावत असणारी पाणीटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले प्रचंड दर, औषधावर होणारा मोठा खर्च,
वाढत्या तसेच व्यवस्थापन खर्च, औषधांच्या किमती, या सर्व बाबींचा विचार करता सध्या दूध धंदा लिटर मागे १५ रुपये तोट्यात सुरू आहे. शेतकऱ्यांच्या इतरही शेतीमालाला बाजारात कवडीमोल किंमत मिळत असल्याने, सुशिक्षित बेरोजगार व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जीवन कसे जगावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
म्हणून या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने सदरचे अनुदान जोपर्यंत नैसर्गिक रित्या दुधाला भाव वाढ मिळत नाही, तोपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी कोल्हेवाडीतील सर्व दूध उत्पादक शेतकरी यांनी केली आहे.