Unseasonal Rain : गारपिटीमुळे पिकांची धुळधान झाली असताना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वर्धा जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा झाली. विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने प्रचंड नुकसान झाले.
वर्धा शहरात सायंकाळी साडेसहा वाजता वादळीवाऱ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर गारांचा पाऊस पडला व काही वेळानंतर पावसाला सुरुवात झाली सायंकाळची वेळ असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अनेकांना गारांचा मार सहन करावा लागला. वर्धा तालुक्यात विविध गावांमध्ये गारपीट झाली आहे.
आर्वी तालुक्यात हिवरा तांडा परिसरात येणाऱ्या अकरा गावांना गारपिटीचा तडाखा बसला. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात या भागाला गारपिटीने झोडपले होते. मंगळवारी सायंकाळी पाच तीस वाजता वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडला.
नंतर काही वेळाने पावसाला प्रारंभ झाला. तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. येथील संत्रा बागांसह गहू, हरभरा, ज्वारी, मका व भाजीपाल्याच्या पिकांचे न पाहवल्या जाणारे नुकसान असल्याचे सांगण्यात येते.
कारंजा शहरात दुपारच्या सुमारास गारपीट झाली. हिंगणघाट तालुक्यातील मांडगाव परिसराला सायंकाळी झालेल्या गारपिटीने झोपले येथे भरलेला आठवडी बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
पुलगाव शहरात रविवार नंतर आज पुन्हा दहा मिनिट गारपीट झाले आहे. रविवारी ज्या गावात गारपिटीमुळे नुकसान झाले त्या गावांना आज पुन्हा कमी जास्त प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागल्याचे कळते.