Ahmednagar News : गुप्त माहितीच्या आधारे येथील राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर सापळा लावून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला गजाआड करून ७६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास चिंचोली फाटा येथे हि कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.१५ वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे,
पोलीस नाईक प्रविण बागुल, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सचिन ताजणे, सतिष कुऱ्हाडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर चिंचोली फाटा येथे हॉटेल जय भवानी समोर सापळा लावला.
त्यावेळी एक तरुण एमएच १७ सीडी १८८३ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा गाडीवर येताना दिसला. तेव्हा पोलीस पथकाने झडप घालून त्याला पकडले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत गांजा मिळून आला.
या कारवाईत पोलीस पथकाने विकी बाळु आव्हाड (वय २१, रा. घुलेवाडी रोड, राजापूर, ता. संगमनेर) याला गजाआड करून या त्याच्या ताब्यातून ६ हजाराचा ६२० ग्रॅम गांजा व ७० हजाराची अॅक्टिव्हा गाडी, असा एकूण ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी विकी बाळु आव्हाड याला पोलीस पथकाने गजाआड करुन पोलीस नाईक प्रविण बागुल यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करीत आहेत.