अहमदनगर जिल्ह्यात फ्लाईंग स्कॉडची २४ तास भरारी सुरु !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पावले उचलली आहेत.

याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात एकूण ७२ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी या पथकांची २४ तास भरारी सुरू आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया दिवसागणीस पुढे सरकत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता जारी झाली आहे.

निवडणूक विषयक इतर कामकाज आणि प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्हास्तरावर विविध समित्या स्थापन केल्या आहेत. निवडणुकीची प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेतून उपायोजना आणि अंमलबजावणीचे काम सुरू आहे.

यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि त्यांची टीम जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कार्यक्रम पुढे नेत आहे. आचारसंहिता अंमलबजावणी हा निवडणुकीतील महत्त्वाचा भाग होय.

आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी दाखल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन अॅपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तसेच टोलफ्री क्रमांकची देखील सुविधा देण्यात आली आहे.

या तक्रारींची थेट दखल आणि प्रतिसाद देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या निगराणीत आचारसंहिता नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही लोकसभा मतदारसंघातील बारा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत एकूण ७२ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. एका विधानसभा मतदार संघात सहा भरारी पथके कार्यरत झाली आहेत.

एका पथकामध्ये एक कार्यकारी दंडाधिकारी, एक पोलिस अधिकारी आणि तीन पोलीस जवान असे एकूण पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ७२ पथकात एकूण ३६० अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिवसा तीन पथके आणि रात्री तीन पथके आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नजर ठेवून आहेत. अॅपवर तक्रार प्राप्त होताच संबंधित क्षेत्रातील भरारी पथकास सूचित करण्यात येत असून त्यांनतर तात्काळ भरारी पथक संबंधीत ठिकाणी हजर होवून पडताळणीसह पुढील कार्यवाही करीत आहे. या भरारी पथकांची इतर घडामोडींवर देखील नजर असणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe