Maharashtra News : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ५७ उमेदवारांच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात उमदेवारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदे,
पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंत चव्हाण, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केला असून तेथे साजिद खान पठाण यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यावेळी अरुणाचल प्रदेशातील २, गुजरातमधील ११, कर्नाटकातील १७, राजस्थानातील ६, तेलंगणातील ५, पश्चिम बंगालमधील ८ आणि पुद्दुचेरीमधील एका उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली.
नुकतीच भाजपकडूनही महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार काँग्रेसकडून गुरुवारी रात्री महाराष्ट्रातील आपल्या सात उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
अपेक्षेप्रमाणे कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूरमधून गतवेळचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
पुण्यातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंत चव्हाण, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, तर लातूरमधून शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.