राजकारण्यांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ – जरांगे-पाटील

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र या राज्यातील सर्वच राजकारण्यांनी गेली ७५ वर्षे केले आहे; परंतु आता मात्र मराठा समाज एकवटला असून, आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही.

राज्य सरकार फक्त १० टक्के आरक्षण देत असून, ते न टिकणारे असेल. आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सरकार व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणावर एक शब्दही काढला नाही, त्यामुळे आता यांची सुट्टी नाही.

आचारसंहिता संपल्यावर माझी गाठ त्यांच्याशीच असून, त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. राजकारण्यांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे, असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पारनेर शहरातील बाजारतळ येथे मनोज जरांगे-पाटील यांचा शनिवारी महासंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जरांगे-पाटील यांच्यावर पारनेर सकल समाजाच्यावतीने ५० जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत, वाजतगाजत जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी जरांगे-पाटील यांनी सरकार व राजकारण्यांवर हल्लाबोल करताना सांगितले की, गेली ७५ वर्षे राजकारणी व राजकीय पक्षांनी मराठा समाजाला झुलवत ठेवत आरक्षणापासून वंचित ठेवले. आता तरी मराठा सामाजाने एकत्र येऊन आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटले नाही पाहिजे, मी तर घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत आहे.

समाजानेही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटित राहून आरक्षण मिळवले पाहिजे. सरकार फक्त १० टक्के आरक्षण देत असून, ते न टिकणारे असेल. आचारसंहिता संपल्यावर माझी गाठ त्यांच्याशीच आहे, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe