Weather Update : मार्च महिना आता समाप्तीकडे जात आहे. येत्या पाच दिवसात मार्च महिना समाप्त होईल. दरम्यान आज आपण मार्च महिन्यातील शेवटच्या पाच दिवसांचे हवामान कसे राहणार ?
यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर, आज भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती.
यामुळे आगामी पाच दिवसाचे हवामान कसे राहणार हा मोठा सवाल आहे. दरम्यान, याच संदर्भात आता विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
16-20 मार्च दरम्यान वादळी पाऊस आणि गारपीट
महाराष्ट्रात 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान वादळी पाऊस आणि गारपीट झाली होती. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या विभागात वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेली शेती पिके यामुळे वाया झालीत.
पुढील पाच दिवसांचे हवामान कसे राहणार ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 26 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पुढील पाच दिवस पावसाची शक्यता राहणार नाही असे कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी सांगितले आहे.
कालावधी किमान तापमान 19 ते 21°c दरम्यान आणि कमाल तापमान 38 ते 40°c दरम्यान राहील असे देखील संशोधन केंद्राने स्पष्ट केले आहे. अर्थातच आगामी पाच दिवस कमालीचा उकाडा जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज राहणार आहे.
या कालावधीत उष्माघात होण्याची देखील शक्यता असते यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क रहावे. एकंदरीत सध्या स्थितीला राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळतेय. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक धरणे आता कोरडी होऊ लागली आहेत.
विशेष म्हणजे आता आगामी पाच दिवस हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असा अंदाज आहे. आकाश पुढील तीन दिवस प्रामुख्याने निरभ्र व त्यानंतर दोन दिवस अंशतः ढगाळ राहणार आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग 11 ते 12 किलोमीटर प्रति तास एवढा राहणार असे म्हटले आहे.