जिल्ह्यात ८२ टँकरद्वारे पाणी पुरवठा…! जिल्हाधिकारी सालीमठ यांनी टंचाईचा घेतला आढावा

Ahmednagar News : ‘ऊन वाढत आहे, त्यामुळे बाष्पीभवन प्रक्रियेची गती वाढणे सहाजिक आहे. याचा परिणाम म्हणून पाणी साठ्याचा स्तर घटत आहे. हे लक्षात घेऊन जे पाणी उपलब्ध आहे, ते जपून वापरावे.

पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले आहे. तसेच ‘क्षेत्रीय यंत्रणांनी टंचाई परिस्थितीत फील्डवर दक्ष आणि सज्ज रहावे.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरचे आवश्यकतेनुसार नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी टंचाई उपाययोजनांशी निगडित यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात मंगळवारी (दि २६) जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टंचाई परिस्थितीची आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील,

रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील, श्रीगोंदा प्रांताधिकारी गणेश राठोड, श्रीरामपूर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, पाथर्डी प्रांताधिकारी प्रसाद मते, संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, कर्जत प्रांताधिकारी नितीन पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, मदत व पुनर्वसन शाखेच्या नायब तहसीलदार भारती घोरपडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे,

अव्वल कारकून प्रवीण कांबळे, महसूल सहायक धनसिंग गव्हाणे यांच्यासह भूजल सर्वेक्षण, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच ऑनलाइन व्हीसीद्वारे शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि सर्व गटविकास अधिकारी हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा तालुका निहाय सविस्तर आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी जिल्ह्यात शासकीय टँकरद्वारे करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची माहिती दिली.

तहान भागवतात ८२ टँकर

दरम्यान, जिल्ह्यातील गरजवंत नागरिकांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ८२ टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. जिल्ह्यातील ८४ गांवे आणि ३९६ वाड्या, वस्त्यांवरील एक ६९ हजार १९ इतक्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाच्या ८२ टँकरची दररोज धावाधाव सुरु आहे.