Ahmednagar News : दहावीचे पेपर दिल्यानंतर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती.
या घटनेतील पीडित मुलीचा राहुरी पोलिस पथकाने २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश, की एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने काल दिनांक २६ मार्च २०२४ रोजी १० वीचे पेपर दिले. त्यानंतर तिचे राहुरी तालुक्यातील सात्रल येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण झाले.
या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३६/२०२४ नुसार भादंवि कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या मुलीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिदे,
विकास साळवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलिस नाईक प्रविण बागुल, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजणे, गोवर्धन कदम, अजिनाथ पाखरे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले यांच्या पथकाने मुलीला शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले.
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. राहुरी पोलिस पथकाच्या या कारवाईमुळे सर्व सामान्य नागरिकांमधून पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय करीत आहेत.