Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळण परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेतील १६ वर्षे २४ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीने काल दिनांक २६ मार्च २०२४ रोजी दहावीचे पेपर दिले. त्यानंतर ती दुपारच्या सुमारास तिच्या घरी गेली आणि रात्री जेवण केल्यानंतर घरात झोपी गेली होती.
दिनांक २७ मार्च २०२४ रोजी पहाटे दिड वाजेच्या सुमारास मुलीच्या नातेवाईकाला जाग आली. तेव्हा त्यांना पीडित मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी पीडित मुलीचा परिसरात शोध घेतला; मात्र ती कोठेही मिळून आली नाही.
मुलीचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३७/२०२४ नुसार भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे करीत आहेत.