लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला गावगाड्यातील राजकीय वातावरण तापले

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची देखील धावपळ सुरू झाली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी चालणाऱ्या गावगाड्याच्या गप्पांऐवजी आता राजकीय आखडे कसे जुळवले जातात याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून त्या अनुषंगाने आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या वाड्या-वस्त्यांवर निवडणूकीची चर्चा रंगत असून महायुती व महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार ?

उमेदवार कोण असणार ? बंडखोरी होणार का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या चर्चेत रंगू लागले आहेत. दरम्यान उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, याची चिंता राजकीय पक्षांऐवजी कार्यकर्त्यांनाच जास्त लागून राहिल्याचे चित्र आहे.

निवडणूकीच्या आखाड्यात आता नव्याने रंग भरणार असून उमेदवार निश्चितीनंतर ‘आर या पार’ पवित्रा घेऊन एकमेकांची जिरवा जिरवी होणार असली तरी, रंग पंचमीत कार्यकर्त्यांची मात्र राजकीय धुळवड सध्या ग्रामीण भागात सुरु आहे.

कडक उन्हामुळे उमेदवारांना घाम फुटणार आहे, ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांपुढे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे. प्रखर उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचाराला फटका बसणार आहे.

सकाळी किंवा दुपारनंतर प्रचार करावा लागणार आहे. ही निवडणूक अगदी रंगात येणार असून, उमेदवारांच्या भाऊ गर्दीत मतदार यातून कसा मार्ग काढतात हे येणारा काळच ठरवणार आहे. सध्या चौकाचौकात, कट्टया कट्ट्यांवर सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा होत आहे.

या लोकसभा निवडणूकीत बदललेली राजकीय समीकरणे, आरोप-प्रत्यारोपांमुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. हा निवडणूक ज्वर आता गावोगावी पाहावयाला मिळत आहे.

आपल्या इलाख्यातून यावेळी कोण बाजी मारतो, याचे आडाखे बांधले जाणार आहेत. सोशल मिडियावरही निवडणूक अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार असल्याने नेतेमंडळींनाच नव्हे, तर कार्यकर्ते व नेटकऱ्यांनाही आता भान ठेवावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe