Ahmednagar News : नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जप्त केलेल्या ७२ लाखांच्या रोख रकमेचा हिशेब आठवडाभरानंतरही जुळलेला नाही. यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाच्या समितीला प्राप्तिकर विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अद्याप हा अहवालही मिळालेला नसल्याने पकडलेली रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती, बेहिशेबी होती की हवालाच्या माध्यमातून व्यवहार सुरू होता, याचा उलगडा झालेला नाही.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ख्रिस्त गल्ली व बाजार समितीमधील एका गाळ्यातून ७२ लाखांची रोकड जप्त केली. ही रक्कम निवडणुकीशी संबंधित आहे का, याची चौकशी सध्या निवडणूक यंत्रणेमार्फत केली जात आहे.
त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी अशा तिघांची समिती आहे. या समितीने प्राप्तिकर विभागाकडून ७ दिवसांत अहवाल मागवला आहे.
तो अद्यापही समितीला प्राप्त झालेला नाही. रक्कम जरी दोघांकडून जप्त केली असली, तरी प्रत्यक्षात ती ५ जणांची असल्याचे समोर आल्याचे समजते. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात ५ जणांना नोटीसा बजावल्याचेही सांगण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.