भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा विरोध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे शनिवारी (दि. ३०) येथे येत असून कलश मंगल कार्यालय येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत; मात्र त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळत आहे.

कोपरगावमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे. काही विघ्नसंतोषी लोक कोपरगावची शांतता भंग करून आणि मतांचे राजकारण करण्यासाठी भिडे यांना कोपरगावात बोलवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निवेदनात म्हटले, की आमचा कोणत्याही संघटनेला किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना विरोध नाही; मात्र कोपरगाव येथे शनिवारी होणाऱ्या भिडे यांच्या कार्यक्रमाला आमचा विरोध असून त्याला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावू.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यात मालेगावच्या पाकिजा कॉर्नर चौकातदेखील भिडे यांची गाडी अडवून यांना असाच विरोध झाला होता. आता कोपरगाव दौरा चर्चेत आला आहे.

कोपरगाव शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हानिकारक असणारे वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील शांतता बिघडण्याची दाट शक्यता असल्याने कार्यक्रमाला परवानगी देऊ नये.

यावेळी जितेंद्र रणशूर, प्रकाश दुशिंग, विजय त्रिभुवन, शरद खरात यांनी कोपरगावमधील शांतता भंग पावल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा यावेळी दिला.

निवेदनावर जितेंद्र रणशूर, अनिल रणनवरे, शरद खरात, विजय त्रिभूवन, नितीन बनसोडे, मनोज शिंदे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र उशिरे, दिनेश कांबळे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, राहुल रणशूर, शुभम शिदे, अशोक शिंदे, नंदू कोपरे, गौतम रणशूर, संजय दुशिंग, योगेश शिंदे, देवराम पगारे, संजय कांबळे, प्रतिक पगारे, मयूर रीळ, अर्जुन मरसाळे, संदीप पगारे यांच्या सह्या आहेत.

तहसीलदार संदीपकुमार भोसले तर शहर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे होते.

जबाबदारी नेमकी कुणाची?

आचार संहिता असल्यामुळे परवानगी देणे न देणे हा विषय निवडणूकक ि निर्णय अधिकारी यांच्या अधिकार कक्षेत येतो, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. तर या कार्यक्रमाबाबतची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे, असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे म्हणणे असल्याचे आंदोलकांनी सांगितले.