भरदिवसा डॉक्टरांच्या गाडीतून ६ लाख लंपास संगमनेरातील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Published on -

Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने भरदिवसा एका डॉक्टरांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली सहा लाखांची रक्कम लंपास केली. शहरातील अकोले बायपास वरील एका जनरल स्टोअर्स समोर काल शनिवारी (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, डॉ. राजेंद्र भाऊसाहेब म्हस्के (रा. पोकळे मळा, संगमनेर) यांनी काल शनिवारी (दि.३०) दुपारी बँकेतून सहा लाख रुपयांची रक्कम काढली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही रक्कम आपल्या स्कुटी गाडीच्या डिक्की मध्ये ठेवली.

ही रक्कम घेऊन ते आपल्या घरी जात असताना काही वेळ अकोले रस्त्यावरील त्रिमूर्ती जनरल स्टोअर्स जवळ थांबले होते.अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेऊन गाडीच्या डिक्की मध्ये ठेवलेले सहा लाख रुपये चोरून पलायन केले.

डिक्की मध्ये डॉ. म्हस्के यांनी पाचशे रुपयांच्या बाराशे नोटांचा बंडल ठेवलेला होता. आपल्या गाडीच्या डिक्की मध्ये ठेवलेली चोरी झाल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले. मात्र तोपर्यंत चोर पळून गेला होता. या चोरट्याने डॉ. म्हस्के यांच्यावर पाळत ठेवून डल्ला मारला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डॉ. म्हस्के यांनी संध्याकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News