Weather News : देशात आतापासूनच उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच एप्रिल ते जून महिन्यादरम्यान तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी दिला. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात महाराष्ट्र,
गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये गव्हाच्या पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले.
देशात लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत पार पडत असतानाच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिल ते जून महिना अत्यंत उष्ण असेल, बहुतांश भागात कमाल तापमान हे सामान्यपेक्षा अधिक उष्ण राहील.
तसेच मध्य व पश्चिमेकडील राज्यांवर या उष्णतेचा वाईट परिणाम होणार आहे. हिमालयीन राज्ये, ईशान्य भारत आणि उत्तर ओडिशा राज्यात तापमान कमालपेक्षा कमी किंवा बरोबरीचे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असे महापात्रा म्हणाले.
निवडणूक काळात मतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांना उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. एप्रिल-जूनदरम्यान मैदानी भागात बहुतेक ठिकाणी सामान्य उष्णतेच्या लाटेचे दिवस राहतील. देशाच्या विविध भागांमध्ये १० ते २० दिवस उष्ण लाट येऊ शकते. विशेषतःगुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता महापात्रा यांनी व्यक्त केली.
मध्य भारत व उत्तरेकडील मैदानी भागात तथा दक्षिण भारतात एप्रिलमध्ये सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेची लाट राहील. या राज्यांत १ ते ३ दिवसांच्या तुलनेत २ ते ८ दिवस उष्णतेची लाट उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, आगामी अडीच महिन्यांत भारताला अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागणार आहे. तरीही देशातील एक अब्ज लोक मतदानाचा हक्क बजावतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय भू-विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे.