काळजाला भिडणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या आईचा मुलीच्या अंगावर अक्षता पडण्याआधीच मृत्यू झाला आहे.
मुलीचे लग्न उंबरठ्यावर येऊन ठेपलेले असतानाच मुलीच्या आईवर अपघातामध्ये काळाने घाला घातला व आईचा जीव घेतला. ही अपघाताची घटना नगर तालुक्यातील वाळकी शिवारात घडली असून मृत आई ही चास येथील आहे. सुवर्णा भाऊसाहेब भोर (वय ४० रा. चास ता. नगर) असे मृताचे नाव आहे.
मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पती समवेत दुचाकीवर त्या चालल्या असता अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती समजली आहे.
येत्या ५ एप्रिलला सुवर्णा भोर यांच्या मुलीचे लग्न असून त्याचे निमंत्रण त्या नातेवाईकांना देत होत्या. एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी दुपारी त्या काही कार्यानिमित्त चालल्या होत्या व त्यांचे पती भाऊसाहेब भोर दुचाकी चालवत होते.
ते वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर आले असता गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली व सुवर्णा या उडून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला.