Ahmednagar News : सध्या कडक उन्हामुळे प्रचंड उष्णता जाणवते, अंगाची लाही लाही होते आहे, अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. त्यातच भरीस भर म्हणून निघोज परिसरात कायमच विजेचा लपंडाव असतो, जी वीज मिळते, तिही कमी दाबाने मिळते, त्यामुळे व्यावसायिकांसह ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहेत.
निघोज गाव हे तालुक्यातील सर्वात मोठे व सघन गाव असून, बाजारपेठेचे आहे. येथे व्यावसायिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे ग्राहकांची संख्या मोठी असल्याने व्यावसायिकांना विजेची आवश्यकता असते; परंतू नेमके विजेची गरज असतानाच वीज गायब होते.
शेतीपंपाच्या विजेचीही अशीच परिस्थिती आहे, पाणी शेतात पोहचत नाही तोच वीज गायब होते, त्यामुळे महावितरणच्या अशा कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. महातिरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता, एकतर संपर्क होत नाही, झाला तर व्यवस्थित उत्तरे मिळत नाहीत.
मिव्ययले तर नेहमीचेच उत्तर काम चालू आहे, वीज कधी येईल सांगता येत नाही. मग विचाराचे कोणाला, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असतो. निघोज, पठारवाडी, शिरसुले, वडगाव गुंड, वडनेर, ढवणवाडी, कुंड, देवीभोयरे, पाडळी दर्या, वडझिरे, लोणी मावळा, पिंपरी जलसेन, या आणि पारनेर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये हा विजेचा खेळखंडोबा झाला आहे.
सध्या प्रचंड उष्णतेमुळे प्यायला पाणी व शेतीला पाणी देणे गरजेचे आहे, परंतू नियमित व पुर्णदाबाने वीज मिळत नसल्याने तेही वेळेवर शक्य होत नाही, वीज बिल मात्र सक्तीने वसूल केले जाते, मग व्यावसायिक, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नेमके करायचे काय ?