भंडारदऱ्यातील रस्ता म्हणजे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना

Published on -

Ahmednagar News : निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलेल्या भंडारदरा पर्यटनस्थळावर रस्त्यांनी कात टाकली असली, तरी डांबरीकरण चांगले आणि सिमेटीकरण खराब अशी रस्त्यांची अवस्था असल्याने या खराब रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे रस्ते म्हणजे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना असल्याचे बोलले जात आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ, त्यामुळे वर्षभर भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद घेत असतात. कोणत्याही पर्यटन स्थळाचा रस्ता हा त्या भागाचा आत्या समजला जातो.

दोन तीन वर्षांपूर्वी भंडारदऱ्याला यायचे म्हणजे अत्यंत खराब रस्त्याचा सामना करावा लागायचा. खराब रस्त्याच्या कारणास्तव अनेक पर्यटक भंडारदऱ्याला येण्याचे टाळायचे, पंरतु आता मात्र भंडारदऱ्याचं नशिब पालटलेलं दिसतंय, रंधा धबधबा ते वारंघुशी फाटा हा रस्ता भंडारदरा पर्यटन स्थळावरुन जातो.

साधारणतः दोन ते अडीच वर्षापासुन या रस्त्याचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्ण झाले आहे, तर भंडारदरा धरणाच्या सांडव्यापासुन ते चिचोंडी गावापर्यंत सर्व रस्ता सिमेंटीकरणात पूर्ण झालाय. चिंचोंडीपासुन वारंघुशी फाट्यापर्यंत पुन्हा सुंदर असे डांबरीकरण आहे.

या रस्त्याचे डांबरीकरण अतिशय सुंदर असे करण्यात आले आहे. त्यामुळे कुणालाही या रस्त्यावरुन गाडी पळविण्याचा मोह आवरता येत नाही. उत्कृष्ट कामाचा एक नमुनाच सदर काम करणाऱ्या ठेकेदाराने पेश केला आहे; मात्र सिमेंटीकरणाच्या बाबत ठेकेदार नापास झाला आहे. अनेक ठिकाणी सिमेटीकरणाचा रस्ता बनविताना स्टिलच वापरले गेले नाही. वापरले गेलेले सिमेट

निकृष्ट प्रतिचे असल्याचे दिसुन येते. अनेक ठिकाणी सिंमेटीकरण करताना रस्ता ओबड धोबड झाला आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम झाल्यानंतर पाण्याचा वापर न झाल्याने रस्ता आत्ताच उखडला असल्याचे दिसते. शेंडी गावामध्ये तर रस्ता अपूर्णच ठेऊन ठेकेदार गायब झाला आहे.

डांबरीकरण चांगले आणि सिमेंटीकरण खराब अशी अवस्था भंडारदरा पर्यटनस्थळावरील अवस्था रस्त्यांची झाली आहे. खराब सिंमेटीकरण असल्याने अनेक छोटे मोठे अपघातही या रस्त्यावर झाले आहेत. भंडारदरा पर्यटन स्थळाला जर नावलौकीक कमवायचे असेल तर अगोदर रस्ते चांगले झाले पाहीजेत. या रस्त्यावरच भंडारदऱ्याचे आर्थिक गणित अवलंबुन आहे. पर्यटकांमुळे आदिवासी तरुणांना रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी रस्त्यांची अवस्था चांगली असणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe