Ahilyanagar News : दोन वर्षांपूर्वी गोळी लागली, तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद केली..आत्ता झाला हत्येचा गुन्हा दाखल, अहमदनगरमधील वेगळाच थरार समोर

Published on -

Ahilyanagar News : दोन वर्षांपूर्वी गोळी लागून मृत्यू.. पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद.. दोन वर्षानंतर भावाने फिर्याद दिल्यानंतर हत्येचा गुन्हा.. झाला वेगळाच थरारक उलगडा.. ही घटना घडलीये राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे.

साधारण दोन वर्षांपूर्वी प्रदीप एकनाथ पागिरे (रा. गुंजाळे) यांचा गुंजाळे (ता. राहुरी) येथे बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता. घटना घडली तेव्हा पोलिसांनी बंदूक जप्त केलेली होती. परंतु, सबळ पुराव्याअभावी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. ही घटना घडून गेल्यानंतर साधारण दोन वर्षानंतर रविवारी (दि.३१ मार्च) त्याच गावातील एका तरुणाविरुद्ध आर्म ॲक्टसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अक्षय कारभारी नवले (रा. गुंजाळे, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अविनाश एकनाथ पागिरे (वय ३६, रा. गुंजाळे) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत प्रदीप पागिरे यांचे ते बंधू आहेत.

पागिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रदीप एकनाथ पागिरे हे गुंजाळे येथे शिलाई काम करायचे. त्यावरील अर्थार्जनावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यांचे जेथे दुकान होते त्याच्याच समोर आरोपी नवले याचे घर असल्याने आरोपीची त्यांच्याकडे नेहमी उठबस असायची. ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान आरोपी नवले तेथे आलेला होता. काहीतरी कारणामुळे आरोपीने प्रदीपच्या नाकावर बंदुकीतून गोळी मारल्याने ती गोळी प्रदीपच्या मानेत जाऊन अडकली होती.

दरम्यान त्यानंतर आरोपीने प्रदीप यांना स्वतःच्या चारचाकी वाहनातून अहमदनगर येथे एका रुग्णालयात नेले व तेथे वाहन पार्किंग करण्याच्या नावाखाली पळ काढला. रुग्णालयात उपचारापूर्वी प्रदीपचा मृत्यू झाल्याने त्यावेळी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आता नातेवाईकांना हत्याप्रकरणी गावातून माहिती मिळाली असून आरोपी अक्षय नवले याने प्रदीपचा खून केल्याचा संशय असल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी म्हटले आहे की, ही घटना दोन वर्षांपूर्वीची असून साक्ष पुरावा नसल्याने पागिरे यांची हत्या झाली की, आत्महत्या केली याचा निष्कर्ष त्यावेळी निघालेलं नव्हता. त्यामुळे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती परंतु आता मृताच्या भावाने संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असल्याने पुढील तपास सुरु केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe