आता एसटीचे प्रवासीही झाले डिजिटल !

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : सुट्या पैशांवरून होणारे प्रवासी आणि वाहक यांच्यातील वाद टाळण्यासाठी एसटी महामंडळाने डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला.

आजच्या घडीला प्रतिदिन सरासरी ५ ते ६ हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे आपले तिकीट काढत असून यामुळे दरमहा ४ ते ५ कोटी एवढा महसूल प्राप्त होत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

देशभरात डिजिटल पेमेंट जागोजागी उपलब्ध आहे. पानाच्या टपरीपासून ते भाजीवाल्यापर्यंत डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार करण्यात येत आहे. या पर्यायामुळे सुटे पैसे अथवा रोख बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचे आवाहन केले आहे. एसटी बसेसमधून प्रतिदिन ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून देखील प्रवासादरम्यान वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली.

याचा फायदा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये फोनपे, गुगल पे यासारख्या यूपीआय पेमेंटद्वारे वाहकाकडे असलेल्या अँड्रॉईड तिकीट मशीनवर क्यूआर कोडद्वारे तिकीट काढता येत आहे.

या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद मिटत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe