Ahmednagar News : अहमदनगरमधील एका खेड्यातील शेतमजूराचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर !

Ahmednagarlive24 office
Published:
tushar

Ahmednagar News : केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे..अशी एक म्हण आपल्याकडे आहे. परिस्थिती नसली, जास्त पैसा गाठीशी नसला फक्त चिकाटी असली तरी शून्यातून विश्व निर्माण करता येते. जणू काही याचाच मूर्तिमंत पाठ दिलाय अहमदनगर जिल्ह्यातील एका खेडेगावातील शेतमजुरी करणाऱ्याच्या मुलाने.

या शेतमजुराचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर बनलाय ! तुषार भोंडवे असे या डॉक्टर झालेल्या मुलाचे नाव असून दिलीप भोंडवे असे शेतमजुरी करणाऱ्या त्याच्या वडिलांचे नाव आहे. ते राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेतमजूर म्हणून काम करतात. तुषार भोंडवे याने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.

देवळाली प्रवरा येथे दिलीप भोंडवे हे शेतमजूर म्हणून आपल्या पत्नीसह काबाडकष्ट करत असतात. तुषारच्या वडिलांचे शिक्षण नववीपर्यंत, आईचे शिक्षण आठवीपर्यंत. स्वतः कमी शिकले असले तरी आपल्या मुलाने उच्चशिक्षित व्हावे, असा पहिल्यापासून या पती-पत्नीने उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला होता.

त्यास त्यांचा मुलगा तुषार यांनी देखील साथ देत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला आणि तुषार दिलीप भोंडवे हा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सने नुकताच एमबीबीएस अंतिम वर्षाचा निकाल घोषित केला. त्यात डॉ. तुषार दिलीप भोंडवे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्यांनी मुंबई येथील नायर हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.

आईवडिलांचे चीज झाले !
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव तुषार यांना होती. शेतमजुरी करणाऱ्या भोळ्याभाबड्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून तुषार नेहमीच अभ्यासामध्ये मग्न राहिला. या यशापर्यंत पोहचण्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप मोठा हातभार आहे. ते जास्त शिकले नाही पण मला त्यांनी डॉक्टर बनवले. याचा खूप अभिमान आहे.

मी आज जो काही आहे ते माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे फळ आहे, असे मला वाटते, असे डॉ. तुषार यांनी सांगितले. माझ्या मुलाला गरिबीची जाण असल्याने त्याने आम्हाला कधीही जास्तीचा आर्थिक त्रास दिला नाही. जो खर्च येईल तो आम्ही मोलमजूरी मधून भागवत त्याला शिक्षणासाठी पैसा दिला. त्याने गरिबीची जाण असल्यामुळेच हे यश प्राप्त केल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे डॉ. तुषारचे वडील दिलीप भोंडवे यांनी सांगितले.

गावातच शिक्षण
देवळाली प्रवरायेथेच त्याने प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देखील घेतले. देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज या विद्यालयात तो बारावी इयत्तेत विद्यालयात दुसरा आला आणि पुढे त्याला एमबीबीएसला ऍडमिशन मिळाले. त्यांनी ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास करून आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe