पीक कर्जावरील वसूल केलेले व्याज जिल्हा बँक परत करणार : कर्डिले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित ३ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावरील दि.१५ ते दि. ३१ मार्च२०२४ पर्यंत वसुल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील ३ लाखापर्यंतच्या व्याज वसुल न करण्याबाबतच्या सुचना सर्व जिल्हा बँकांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार बँकेने दि. २८ मार्च रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याज वसुल न करण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या.

तथापि, प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांनी त्यांना सदरहू परिपत्रक मिळण्यापुर्वी नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांकडून पीक कर्जावरील व्याज वसुल केलेले होते.

याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत दैनिक वृत्तपत्रांमध्ये व्याज वसुल न करण्यासंदर्भाने बातमी प्रसिध्द केलेली होती. तसेच पीक कर्जावरील व्याज वसुल केलेल्या सर्व संस्थांमार्फत सभासद निहाय माहिती मागविणेबाबत शाखा व सोसायटयांना दि.१ एप्रिल रोजीच्या परिपत्रकानुसार सुचना देखील दिलेल्या आहेत.

सदरहू परिपत्रकानुसार माहीती संकलीत करण्याचे काम चालु असुन त्यानुसार वसूल केलेले व्याज लवकरच संबंधित कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्यात येणार आहेत. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दि.१५ एप्रिल रोजी बँकेचे संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

ज्या शेतकरी सभासदांनी दि.३१ मार्च २०२४ पर्यंत विहीत मुदतीत पिक कर्ज नियमित भरणा केलेला आहे अशा सर्व शेतकरी सभासदांना नियमानुसार खरीप पिक कर्ज त्वरीत वितरीत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे यापुढे देखील जे शेतकरी सभासद मागील पिक कर्जांची परतफेड करतील अशा सभासदांना देखील त्वरीत कर्ज वितरीत करण्यात येईल. अशी माहिती बँकेचे चेअरमन कर्डीले यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe