Ahmednagar News : सध्या वातावरणात चांगलीच उष्णता वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता आता जाणवू लागली आहे. पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना याची धग जास्त जाणवते. हीच धग कमी करण्याच्या प्रयत्नात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
ऊन वाढलं म्हणून छतावर उसाचे वाढे टाकायला तो गेला होता. तेथेच त्याला विद्युत तारेचा जबर शॉक बसला. त्यात तो गतप्राण झाला.

ही हृदयद्रावक घटना घडलीये श्रीरामपूर तालुक्यात. ओम संतोष देवराय (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.
अधिक माहिती अशी : श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील ओम संतोष देवराय हा दहावीत शिकत असलेला मुलगा त्याने नुकतीच मार्चमध्ये दहावीची परीक्षा दिली होती. ओम हा पत्र्याच्या घरात राहत असल्याने त्यांना आता वाढत्या उष्णतेची झालं लागत होती.
ही उष्णतेची धग कमी व्हावी यासाठी तो घराच्या छतावर उसाचे वाढे टाकायला गेला. त्याच्या पत्र्यावरून विजेची तार गेलेली आहे. त्याचा त्याला जबर शॉक लागला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कान्हेगावचे सरपंच देवराय यांचा ओम हा पुतण्या असून तो शांत व संयमी असा होता. तो नेहमी धार्मिक कार्यात अग्रेसर असायचा अशी माहिती समजली आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.